Ad will apear here
Next
कमोदिनी काय जाणे...


कमोदिनी काय जाणे तो परिमळ ।
भ्रमर सकळ भोगितसे ।।१।।
तैसें तुज ठावें नाही तुझें नाम ।
आम्हीच तें प्रेमसुख जाणो ।।२।।

तुकारामांचा हा अभंग बहुतेकांच्या ओळखीचा. तसा तो अनेकदा माझ्याही कानावरून गेला. पहिल्यांदा ऐकला तेव्हा वाटलं, किती गोड शब्दांत नाममहात्म्य सांगितले आहे महाराजांनी. नाम संकीर्तन हे तर भक्तियोगातील महत्त्वाचे आयुध. आणि त्याची तुलना तुकोबांनी थेट वाऱ्याबरोबर मुक्त विहरणाऱ्या गंधाशी केली आहे. म्हणजे नाम जपतो त्याचेही आयुष्य फुलासारखं मोहरून येणार आणि ज्याच्या कानी पडेल त्याला ही आनंदच. आणि हे सांगताना, त्या विटेवरच्या विठ्ठलालाच आव्हान... ‘तुझं नावही तुझं नाही, आमचंच’ हे थेट सांगण्याचं धाडस. भक्तीत आकंठ बुडालेल्या भक्ताचा अधिकारच असतो  तसा... 

पण जसजसा हा परिमळ मनात भिनत गेला तसे प्रश्न पडायला लागले. खरंच, एवढंच का सांगितलंय तुकोबांनी? या शब्दार्थापलीकडे अजून काही भावार्थ असेल का? देवाला त्याचे नाव माहीत नाही, हे ठीकच. कारण तुझा विठ्ठल - माझा गणेश. याचा शिव-त्याचा विष्णू, असे हे भेद आपलेच. तो देव आहे, निर्गुण-निराकार. या विश्वाचा पालनहार. भक्तांच्या या खोट्या भांडणात त्याने का पडायचं? त्याला विठोबा म्हणा, विठ्या म्हणा. सावळा म्हणा वा काळतोंड्या म्हणा, तो ऐकतोच. नावाचं अप्रूप त्याला नाही, ते आपल्यालाच. त्याला हवी हृदयातील निर्मळता. 

पुढे-मागे जर कधी आपले मन खरेच असे निर्मळ होऊ शकले तर मग कदाचित त्याला हाक मारायचीही गरज उरणार नाही. फांदीवर उमललेल्या फुलाकडे तुम्ही बघा अथवा बघू नका, त्याचा सुगंध दरवळणारच. मांगल्य-पावित्र्य पसरवणे हा त्याचा स्वभाव. आता तो सुगंधित श्वास उरात कसा-किती भरून घ्यायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न. मनात आधीच किल्मिष असेल तर नाहीच भरून घेता येणार काही. त्यासाठी आधी आपण रितं असायला हवं. तसंही आपल्या ठायी अहंभाव बाळगायचा म्हटला, तरी कसला? त्या सर्वव्यापी परमेश्वराचे आपण कणमात्र अंश. जिथे त्याचेच नाव नाही, तिथे आपण कोण? कुठले? कसल्या पदव्या मिरवायच्या? या देहाला जे नाव आहे - तेही कुणी तरी दिलेले, त्यांच्या सोयीसाठी. शिक्षण-वैभव हेही सापेक्ष. अनेकदा तर असूनही नसल्यासारखे. मग त्याचा कसला एवढा अभिमान?

त्यातही गंमत अशी, की  उद्या एखाद्याने वेगळ्या नावाने हाक मारली तरी आपले अस्तित्व बदलत नाही. किंबहुना बदलायलाच नको. लोकांच्या तालावर, त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियांप्रमाणे वागायला आपण त्यांच्या कठपुतळ्या थोडीच आहोत. कुणी निंदा-कुणी वंदा, आपल्याला आपल्या मार्गाने जाता आले पाहिजे. आणि हा मार्ग परमार्थाचा असेल, तर मग कुणाला घाबरायचं? तो असेलच ना सोबत! थोडे कष्ट पडतील पण तेवढं चालायचंच. तसंही तुकारामांनी सांगूनच ठेवलंय... 

माते तृण बाळा दुधाची ते गोडी ।
ज्याची न ये जोडी त्यासी कामा ।।३।।
तुका म्हणे मुक्ताफळ शिंपीपोटीं  ।
नाही त्याची भेटी भोग तियें ।।४।।

गाय चारा खाते तेव्हाच वासराला दूध मिळते. गाईने दुधासाठी हट्ट करून चालत नाही. ज्याचे कर्म त्याला. कर्मफळाचेही तसेच. शिंपल्यापोटी मोती तयार होतात; पण शिंपला काही त्याचे हार घालून मिरवत नाही. ते कुणा तरी भलत्याचेच सुख. तरीही शिंपल्याचं महत्त्व अबाधित राहतं. कारण कुणी तरी करतंय, निःस्वार्थपणे देतंय म्हणून बडेजाव करणाऱ्यांचा डोलारा टिकून आहे. वरवर पाहता या दिखाव्याची भुरळ पडेलही; पण शेवटी पत्त्याचा बंगलाच तो. तो कुणाचा निवारा होऊ शकत नाही. नुसताच सजावटीला ठेवायचा म्हटला तरी कामाचा नाही. जराशा धक्क्यानेही कोसळून पडणार. अशा वरवरच्या गोष्टींमागे पळून, हाती काय लागणार? 

आयुष्याची खरी सार्थकता, उपयुक्त राहण्यात. अंगी गुण असले, की मग परिस्थिती कशीही असो, त्यातून वाट काढता येते. आपलं ऐश्वर्य आपल्याला भोगता नाही आलं तरी चालेल, पण देण्यातलं सुख वाट्याला येतं. निरपेक्ष देण्यातील गोडी एकदा कळली की, मग तो आणि आपण असं द्वैत राहत नाही. त्याला हाक मारावी लागत नाही. वेगळं नावही लागत नाही. मन आपोआप एकरूप  होतं. देणं आणि घेणं असं काही उरतच नाही. उरतं फक्त शाश्वत सुख, अंतरंगातून उमटलेलं.  तुकारामांना कदाचित हेच सुचवायचं असावं. 

- सृष्टी गुजराथी 
संपर्क : ९८६७२ ९८७७१
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QYTACO
Similar Posts
साहित्याच्या पारावर : ११वी मैफल : आत्माराम परब, प्रल्हाद जाधव (व्हिडिओ) ‘ग्रंथाली’च्या ‘साहित्याच्या पारावर’ या ग्लोबल साप्ताहिक साहित्यमैफलीच्या ११व्या भागात लेखक आत्माराम परब आणि लेखक प्रल्हाद जाधव सहभागी झाले होते. डॉ. लतिका भानुशाली यांनी संवादकाची भूमिका निभावली. वाचक प्रतिनिधी म्हणून स्पृहा जोशी आणि मीना गोखले सहभागी झाल्या होत्या.
देवा... आज महाद्वार तू ओलांडावंस...! देवा, मी कसाबसा आलोय तुझ्या पायाशी.. खरं तर तुझं दर्शन घ्यायला.. पण त्याहीपेक्षा वारकऱ्यांचा निरोप द्यायला.. बाहेरच्या सगळ्या हरिभक्तांसाठी तू आज बाहेर यावंस... त्यांचं सांगणं ऐकावंस... तू त्यांच्यासोबत आहेस.. असं आश्वस्त करावंस.. देवा.... चरणाशी एकच मागणं... आज महाद्वार तू ओलांडावंस..
तुमचा अनुग्रहो गणेशु... श्रीगणेशाची कृपा म्हणजे काय हे सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीतील पाच ओव्या आणि त्या ओव्यांतील शब्दरत्ने वेचण्याचा प्रयत्न करू या. आपले सद्गुरू हे प्रत्यक्ष गणेशाची विभूती आहेत असं सांगणाऱ्या या पहिल्या पाच ओव्या! सद्गुरू निवृत्तीनाथांचं वर्णन करताना माउलींच्या वाग्वैभवाला नेहमीच उधाणाची भरती यावी तसं झालंय.
लोकशिक्षक संत तुकाराम जीवनातील सर्व चढउतारांमध्ये संत तुकारामांमधील माणूसपण टिकून राहिले आहे. सर्वसामान्य माणसासारखे राहून, माणूसपणा कायम ठेवून माणुसकीच्या शिडीवरून देवत्वाला पोहोचलेला हा संत आहे. म्हणूनच सर्वसामान्यांना ते आपलेसे वाटतात. त्यांनी लोकशिक्षकाची मोठी भूमिका निभावली. आज तुकाराम बीज आहे. या दिवशी संत तुकारामांचे सदेह वैकुंठगमन झाले असे मानले जाते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language